
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने घेतला मोठा निर्णय
नवी दिल्ली ः अमेरिकेत लॉस एंजेलिस येथे २०२८ मध्ये होणाऱया ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंगचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळाने हा मोठा निर्णय घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळाने गेल्या महिन्यात जागतिक बॉक्सिंगला तात्पुरती मान्यता दिली आणि आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन (आयबीए) ला बाजूला ठेवून नवीन नियामक संस्थेला अधिकार दिले.
आयओसी अधिवेशनात थॉमस बाख यांच्या जागी नवीन अध्यक्षाची निवडही केली जाणार आहे. यासोबतच, २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगचा समावेश करण्याच्या कार्यकारी मंडळाच्या निर्णयालाही मान्यता दिली जाईल. फेब्रुवारीमध्ये जागतिक बॉक्सिंगला तात्पुरती मान्यता मिळाल्यानंतर आम्ही हा निर्णय घेण्याच्या स्थितीत होतो, असे कार्यकारी मंडळाच्या बैठकीनंतर बाख म्हणाले. ते अधिवेशनात मंजुरीसाठी ठेवले जाईल आणि मला खात्री आहे की ते मंजूर होईल. त्यानंतर जगभरातील बॉक्सर खेळाडूंना त्यांच्या राष्ट्रीय महासंघाला जागतिक बॉक्सिंग संघटनेने मान्यता दिल्यास लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये खेळता येईल.
२०२३ मध्ये आयबीएची मान्यता रद्द करण्यात आली
टोकियो ऑलिम्पिक २०२० आणि पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या बॉक्सिंग स्पर्धा आयओसीच्या देखरेखीखाली आयोजित करण्यात आल्या. दीर्घकाळ चालणाऱ्या ऑपरेशनल समस्या आणि स्पर्धांच्या निष्पक्षतेबद्दल प्रश्न उपस्थित झाल्यानंतर २०२३ मध्ये आयबीएची मान्यता रद्द करण्यात आली.
जागतिक बॉक्सिंग अध्यक्षांचे कौतुक
जागतिक बॉक्सिंगचे अध्यक्ष बोरिस व्हॅन डेर व्होर्स्ट यांनी या निर्णयाचे स्वागत केले आणि म्हटले की हा ऑलिम्पिक बॉक्सिंगसाठी खूप महत्त्वाचा निर्णय आहे आणि यामुळे या खेळाला ऑलिंपिक कार्यक्रमात पुन्हा समाविष्ट केले जाईल. मी आयओसी कार्यकारी मंडळाचे आभार मानतो.