
पुणे ः सालाबाद प्रमाणे श्री म्हसोबा देवाच्या यात्रेनिमित्ताने ५ एप्रिल रोजी हवेली तालुक्यातील मौजे लोणीकंद येथे कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. दरवर्षी मातीवर कुस्ती स्पर्धा भरवण्यात येते. परंतु महाराष्ट्रातील कुस्तीगीरांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करुन महाराष्ट्रास ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त करुन द्यावे या उद्देशातून यावर्षीपासून कुस्ती स्पर्धा मॅटवर घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीपदादा कंद व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी जाहीर केले आहे.
या कुस्ती स्पर्धेत साधारण ३० ते ३५ कुस्त्या निकाली जोडण्यात येणार असून कुस्ती पाॅईंटवर नसून चितपट ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मैदानात १ नंबरची कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांची होण्याची शक्यता आहे. कुस्तीगीराने रेसलिंग शुज व काॅश्टुम घालुन कुस्ती खेळावयाची आहे.
महाराष्ट्रामध्ये काही अंशी माती ऐवजी मॅटवर कुस्ती स्पर्धा आयोजनास सुरुवात झाली तर नक्कीच मॅटवरील कुस्तीस प्रोत्साहन मिळेल आणि त्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचा आलेख उंचावण्यास मोठी मदत होणार आहे. महाराष्ट्रात ज्या गावांमध्ये कुस्ती स्पर्धा मॅटवर आयोजित करण्यात येतील अशा गावच्या प्रमुखांचा सन्मान महाराष्ट्र केसरी स्पर्धेत हार फेटा घालून करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने घेतला आहे, असे संदीप भोंडवे यांनी सांगितले.