
इटली संघावर ६४-२२ असा दणदणीत विजय
बर्मिंगहॅम ः विश्वचषक कबड्डी स्पर्धेत गतविजेत्या भारतीय संघाने पहिल्या सामन्यात इटली संघाचा ६४-२२ असा एकतर्फी पराभव करुन स्पर्धेची दिमाखदार सुरुवात केली.
संपूर्ण सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी बजावली. आक्रमण करणारे खेळाडू व बचावपटू यांचा जबरदस्त समन्वय असल्याने इटली संघ संपूर्ण सामन्यात दबावाखाली राहिला. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने १५-२ अशी आघाडी घेऊन सामन्यावर आपली पकड निर्माण केली आणि ही पकड शेवटपर्यंत कायम ठेवली.
विश्वचषक कबड्डी स्पर्धा प्रथमच आशियाई देशांबाहेर होत आहे. त्यामुळे ही स्पर्धा ऐतिहासिक ठरली आहे. गतविजेत्या भारतीय संघाने पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकून जेतेपद राखण्याच्यादृष्टीने सुरेख सुरुवात केली आहे.
सामन्याच्या प्रारंभापासून भारतीय बचावपटूंनी वर्चस्व प्रस्थापित करताना इटलीचा संघ लवकर सर्वबाद केला. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने १५-२ अशी भक्कम आघाडी घेतली होती. इटली संघाला गुणांसाठी मोठा संघर्ष करावा लागला. परंतु, भारतीय बचावपटूंनी भक्कम रणनीती आखल्याने इटली संघाला काहीही करता आले नाही. दुसरीकडे भारतीय संघाचे रेडर्स सतत गुण मिळवत असल्याने पहिल्या हाफपर्यंत भारताची आघाडी ३६ गुणांची झाली होती. इटली संघाने पुनरागमन करण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु भारतीय बचावाची भिंत तोंडणे त्यांना अशक्य झाले.
दुसऱया हाफमध्ये भारतीय संघाने आपले वर्चस्व कायम राखले व ६४-२२ असा दणदणीत विजय नोंदवला. गेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम सामन्यात इराक संघाचा पराभव करुन विजेतेपद पटकावले होते.