
चिपळूण ः श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डेरवण यूथ गेम्समध्ये योगासनाच्या स्पर्धेत राज्यभरातून १७२ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
योगासन स्पर्धा १०, १२, १४ व १७ वर्षांखालील मुले व मुली अशा गटांमध्ये झाली. या स्पर्धेत ७३ मुले व ९९ मुली अशा एकूण १७२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये विशेषत: १४ व १७ वर्षें वयोगटातील खेळाडूंचा अधिक सहभाग होता. या स्पर्धेत राष्ट्रीय खेळाडूंनी देखील सहभाग नोंदवला. यामध्ये भूमिका जोशी, हर्षदा करंबेळकर, नंदेश वरदाई, सलोनी शिर्के, आर्यन मुंडे या राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेसाठी पुणे, गोवा, सांगली, मिरज, इचलकरंजी, कोल्हापूर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू सहभाग घेतला होता. विविध जिल्ह्यातील राष्ट्रीय पंच स्पर्धकांना गुणदान करण्यासाठी उपस्थित होते. प्रत्येक स्पर्धकाने एकूण पाच आसनांचे सादरीकरण केले ज्यामध्ये तीन अनिवार्य व दोन इच्छित आसनांचा समावेश होता. या स्पर्धेतील विविध गटातील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.