
चिपळूण ः डेरवण येथे सुरू असलेल्या डेरवण यूथ गेम्समध्ये झालेल्या जलतरण स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी नोंदवत बाजी मारली.
या स्पर्धेत कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर व रायगड येथून स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धा ८, १०, १२, १४ व १६ वर्ष वयोगटात खेळविण्यात आली. यामध्ये एकूण १५० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी ८५ मुले आणि ६५ मुलींनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेतील सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक विजेते
१६ वर्षांखालील वयोगटात मुलांमध्ये अर्जुन नाईक, रुद्र बच्छाव, रोहन आंबुरे (ठाणे) तर मुलींमध्ये श्रीलेखा पारेख, त्विशा दीक्षित, पूर्वा शिंदे यांनी २०० मी. फ्रिस्टाईल या स्पर्धेत वरील पदके प्राप्त केली. तर १४ वर्षे वयोगटात मुलांमध्ये सिद्धार्थ पवार, विहान दळभिडे व स्पर्श भगत व मुलींमध्ये काव्या रिसबुड, अनिशा काळे, गौरी डौर्ले यांनी पदके प्राप्त केली.
१२ वर्षे वयोगटात रियांश देवकर, मिहीर शिरोडकर, कलेन राम; तर मुलींमध्ये सलोनी साळुंखे, स्वरा कुलकर्णी, सवी गोसावी; तसेच १० वर्षे मुलांच्या वयोगटात मैत्रेय आंबवेकर, शिवांशु खोराटे, स्वरांश सुपेकर व मुलींमध्ये तिया ओसवाल, परिण्या घाडगे, लावण्या राव यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकांची कमाई केली.
यासह स्विमिंग प्रकारातील ५०, १०० मीटर फ्री स्टाईल, ५०, १०० मीटर बॅक स्ट्रोक, ५०, १०० बटरफ्लाय स्ट्रोक, ५०, १०० ब्रेस्ट स्ट्रोक, १००, २०० वैयक्तिक मिडले अशा विविध प्रकारात या स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धांनादेखील खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे नियोजन क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, विनायक पवार यांनी केले.
खेळाडूंची चमकदार कामगिरी
आठ वर्षे वयोगटातील ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात पुण्याच्या तरुष देशपांडे, मुंबईचा मिहीर दळवी व पुण्याचा अद्वैत चाकणकर यांनी तर मुलींमध्ये पुण्याची अन्वी यादव, ठाण्याच्या चार्वी पालरेचा व साताऱ्याच्या स्वस्ती मेस्त्री यांनी उत्तम स्ट्रोकचे प्रर्दशन करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.