
लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक क्रिकेट : विकास नगरकर सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक करंडक टी २० लीग स्पर्धेत ग्रामीण पोलिस संघाने शहर पोलिस संघावर ४२ धावांनी विजय नोंदवत उपांत्य फेरी गाठली आहे. या सामन्यात विकास नगरकर याने अष्टपैलू कामगिरी बजावत सामनावीर पुरस्कार पटकावला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर प्रकाशझोतात हा सामना खेळवण्यात आला. शहर पोलिस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांना हा निर्णय मोठा महागात पडला. कारण ग्रामीण पोलिस संघाने प्रथम फलंदाजी करताना १९.५ षटकात सर्वबाद १४४ धावसंख्या उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना शहर पोलिस संघ २० षटकात आठ बाद १०२ धावा काढू शकला. ग्रामीण पोलिस संघाने हा सामना ४२ धावांनी जिंकून उपांत्य फेरी गाठली.

या सामन्यात सुरज गोंड याने ३९ चेंडूत ५२ धावांची वेगवान खेळी केली. त्याने आठ चौकार मारले. विकास नगरकर याने १९ चेंडूत ३२ धावा फटकावल्या. विकासने दोन षटकार व चार चौकार मारले. इनायत अली याने २६ धावा काढल्या. त्याने तीन चौकार व एक षटकार मारला. गोलंदाजीत सुदर्शन एखंडे याने ७ धावांत तीन विकेट घेतल्या. विकास नगरकर याने २२ धावांत तीन गडी बाद केले. ओमकार मोगल याने २० धावांत दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक : ग्रामीण पोलिस संघ : १९.५ षटकात सर्वबाद १४४ (सुरज गोंड ५२, विकास नगरकर ३२, इनायत अली २६, हिंदुराव देशमुख ९, सुदर्शन एखंडे ३-७, पांडुरंग गाजे २-२२, ओमकार मोगल २-२०, राहुल जोनवाल १-३५) विजयी विरुद्ध शहर पोलिस संघ : २० षटकात आठ बाद १०२ (सुदर्शन एखंडे १२, ओमकार मोगल १५, आर्यन शेजुळ ८, राहुल जोनवाल १६, जिलानी शेख नाबाद १७, दीपक नाबाद ९, इतर २२, विकास नगरकर ३-२२, हिंदुराव देशमुख १-११, युनूस शेख १-९, संजय सपकाळ १-२६, इनायत अली १-६). सामनावीर : विकास नगरकर.