राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे विजेता

  • By admin
  • March 20, 2025
  • 0
  • 9 Views
Spread the love

मुंबई ः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या आमदार सचिनभाऊ अहिर चषक विनाशुल्क राज्यस्तरीय शालेय मुला-मुलींच्या कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी-मालाड स्कूलचा उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळे विजेता ठरला.

निर्णायक बोर्डपर्यंत पिछाडीवर राहिलेल्या प्रसन्न याने अचूक फटकेबाज खेळ करणाऱ्या पुष्कर गोळेचे आव्हान १३-९ असे संपुष्टात आणले आणि अजिंक्यपदाला गवसणी घातली. दमदार प्रारंभासह ९-० अशी आघाडी घेणाऱ्या पुष्कर गोळे याला अखेर अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या-उप विजेत्यांना आकर्षक चषकासह स्ट्रायकर, सिद्धीविनायक प्रसाद व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

परेल येथील वातानुकुलीत आरएमएमएस सभागृहामध्ये ही स्पर्धा झाली. उपांत्य सामन्यात पुष्कर गोळे याने न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरच्या आर्यन राऊतचा ९-७ असा तर प्रसन्न गोळेने शारदाश्रम विद्यामंदिर-दादरच्या सोहम जाधवचा ९-१ असा पराभव केला. स्पर्धेमध्ये आर्यन राऊत व सोहम जाधव यांनी लक्षवेधक कामगिरी बजावली. तसेच पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या निधी सावंत व अद्वैत पालांडे, पार्ले टिळक विद्यालयाचा सार्थक केरकर, एसव्हीएस इंग्लिश स्कूलचा समीर कांबळे, अमेय जंगम, गौरांग मांजरेकर, शिवांश मोरे, प्रेक्षा जैन, वेदांत पाटणकर, तीर्थ ठक्कर, साईराज साखरकर, उमैर पठाण यांनी स्पर्धेच चमकदार कामगिरी बजावली.

मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, जैतापूर आदी जिल्ह्यातील शालेय सबज्युनियर ४० कॅरमपटूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. शालेय खेळाडूंना मार्गदर्शनासह प्रोत्साहन देण्यासाठी १ मे रोजी होणाऱ्या मोफत शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेमध्ये पहिल्या ४ विजेत्यांना थेट प्रवेश दिला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *