भारताच्या शंकर सुब्रमण्यमचा सनसनाटी विजय

  • By admin
  • March 21, 2025
  • 0
  • 8 Views
Spread the love

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाच्या अँटोनसेनला दिला पराभवाचा धक्का

नवी दिल्ली ः भारताच्या शंकर मुथुस्वामी सुब्रमण्यम याने योनेक्स स्विस ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत रोमांचक सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱया स्थानावर असले्लया अँडर्स अँटोनसेन याचा पराभव करुन सनसनाटी निर्माण केली.  

या खळबळजनक विजयासह सुब्रमण्यम याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तीन गेमच्या रोमांचक सामन्यात डेन्मार्कच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अँडर्स अँटोनसेनचा त्याने पराभव केला. २१ वर्षीय वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप २०२२ चा रौप्यपदक विजेता आणि सध्या जागतिक क्रमवारीत ६४ व्या स्थानावर असलेला सुब्रमण्यम याने त्याच्या उत्कृष्ट बचावाचे आणि प्रभावी स्मॅशचे प्रदर्शन करत तीन वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेत्याला ६६ मिनिटांत १८-२१, २१-१२, २१-५ असे पराभूत केले.

तामिळनाडूचा रहिवासी असलेल्या सुब्रमण्यम याच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा विजय आहे. त्याचा पुढचा प्रतिस्पर्धी फ्रान्सचा जागतिक क्रमवारीत ३१ वा क्रिस्टो पोपोव्ह असेल. त्याने या हंगामात आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धेत सुब्रमण्यम हा एकमेव भारतीय एकेरी खेळाडू शिल्लक आहे, तर महिला दुहेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने उपांत्यपूर्व फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या या भारतीय जोडीने जर्मनीच्या एमिली लेहमन आणि सेलिन हॅब्श यांचा २१-१२, २१-८ असा पराभव केला.

इतर भारतीय खेळाडूंमध्ये, इसरानी बरुआला चीनच्या हान कियान शीकडून ६३ मिनिटांत १९-२१, २१-१८, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला तर अनुपमा उपाध्यायला महिला एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वर्दानीकडून १७-२१, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला. सतीश करुणाकरन आणि आद्य वरियथ या मिश्र दुहेरी जोडीला लिऊ कुआंग हेंग आणि झेंग यू चिएह यांच्याकडून १४-२१, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *