
धर्मेंद्र वासानी, रोहन शाह, शुभम मोहिते यांची चमकदार कामगिरी
छत्रपती संभाजीनगर : लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक टी २० करंडक लीग क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात मास्सिया अ संघाने रोमहर्षक सामन्यात एनआरबी संघावर १० धावांनी रोमांचक विजय साकारत अंतिम फेरी गाठली आहे. धर्मेंद्र वासानी, रोहन शाह, शुभम मोहिते यांची कामगिरी लक्षवेधक ठरली.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर प्रकाशझोतात हा उपांत्य सामना झाला. मास्सिया संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, हा निर्णय संघाला फारसा लाभदायक ठरला नाही. मास्सिया संघाने २० षटकात सात बाद १२८ अशी माफक धावसंख्या उभारली.

मास्सिया संघाचा कर्णधार व आक्रमक फलंदाज मधुर पटेल व मुकीम शेख या सलामी जोडीने डावाची सुरुवात आक्रमक केली. २७ धावांची भागीदारी केल्यानंतर मधुर पटेल १६ चेंडूत १९ धावा काढून बाद झाला. त्याने दोन चौकार व एक षटकार मारला. रुद्राक्ष बोडके अवघ्या ३ धावांवर तंबूत परतला. पाठोपाठ मुकीम शेख २८ चेंडूत ३२ धावा काढून बाद झाला. त्याने पाच चौकार मारले.
आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर ठराविक अंतराने मास्सिया संघाचे फलंदाज बाद होत गेल्याने धावगती मंदावली. रोहन राठोड याने २२ चेंडूत दोन चौकारांसह १८ धावांचे योगदान दिले. रोहन शाह एका बाजूने दमदार फलंदाजी करत असताना दुसऱ्या बाजूने कृष्णा पवार (३), शुभम मोहिते (०), दत्ता बोरडे (१) हे फलंदाज बाद झाले.

मधल्या फळीतील फलंदाज रोहन शाह याने सर्वाधिक ४१ धावा काढल्या. रोहन याने ३२ चेंडूत पाच चौकार व एक षटकार ठोकत डाव सावरला. रोहनच्या सुरेख फलंदाजीने मास्सिया अ संघ २० षटकात सात बाद १२८ धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला. अष्टपैलू मंगेश निटूरकर याने नाबाद ३ धावा काढल्या.
एनआरबी संघाकडून स्वप्नील मोरे याने सर्वात प्रभावी गोलंदाजी केली. स्वप्नील याने ३० धावांत चार विकेट घेतल्या. सचिन शेडगे याने २४ धावांत दोन गडी बाद केले. संदीप राठोड याने २० धावांत एक बळी घेतला.
एनआरबी संघासमोर विजयासाठी १२९ धावांचे आव्हान होते. सचिन शेडगे व विनोद लांबे या जोडीने डावाची सुरुवात आक्रमक केली. परंतु, विनोद अवघ्या २ धावांवर बाद झाला. हितेश पटेल याने विनोदला स्वस्तात बाद करुन संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर सचिन व शशिकांत पवार या जोडीने ४६ धावांची भागीदारी करत डावाला आकार दिला. मात्र, सचिन शेडगेची धमाकेदार अर्धशतकी खेळी संपुष्टात आल्यानंतर सामन्याचे चित्र थोडे बदलले. सचिनने अवघ्या २२ चेंडूत ५८ धावा फटकावल्या. त्याने चार उत्तुंग षटकार व आठ चौकार मारले. शुभम मोहिते याने सचिनची विकेट घेऊन सामन्यात रंगत आणली.
सचिन बाद झाल्यानंतर शुभम हरकळ (२), महेश निकम (५) आणि शशिकांत पवार (१६) हे मधल्या फळीतील फलंदाज लागोपाठ बाद झाले आणि सामन्यात अचानक रंगत आली. धर्मेंद्र वासानी याने व्यंकटेश सोनवलकर (८) आणि संदीप राठोड (०) यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद करुन एनआरबी संघाला दबावात आणले. एक बाद ६८ अशा चांगल्या स्थितीत असताना एनआरबी संघ पुढील सहा-सात षटकांत सात बाद ९९ अशा बिकट स्थितीत पोहोचला.
धर्मेंद्र वासानी याने गौरव टेकाळे याला २ धावांवर बाद करुन सामन्यातील तिसरा बळी मिळवला. त्यानंतर मंगेश निटूरकर याने राहुल डांगे याला ९ धावांवर बाद करुन मोठा अडथळा दूर केला. राहुल बाद झाला तेव्हा एनआरबी संघाची स्थिती ९ बाद ११२ अशी होती. हितेश पटेल याने संदीप बलांडे याला ८ धावांवर क्लिनबोल्ड करत संघाला १० धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला. एनआरबी संघाचा डाव १६.४ षटकात ११८ धावांवर संपुष्टात आला. मास्सिया अ संघाने १० धावांनी रोमांचक विजय नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
या विजयाचे हिरो ठरले शुभम मोहिते व धर्मेंद्र वासानी हे गोलंदाज. शुभम याने २१ धावांत तीन विकेट घेतल्या तर वासानी याने १४ धावांत तीन बळी घेतले. हितेश पटेल(२-४७) व मंगेश निटूरकर (१-१८) यांनी महत्त्वाच्या वेळी विकेट घेऊन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. धर्मेंद्र वासानी याने तीन बळी घेत सामन्याला निर्णायक वळण दिल्याने त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला.