
दवाखान्यात उपचार घेऊन खेळताना रझाक शेख ठरले उपविजेते
पुणे ः एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जी पी सहस्त्रबुद्धे एकेरी कॅरम स्पर्धेत अतिशय उत्कंठा वाढवत चित्तथरारक अंतिम सामन्यात राजकुमार ठाकूर याने रझाक शेख यांचा पराभव करुन विजेतेपद पटकावले.
पटवर्धन बाग येथील डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळ असलेल्या एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात संपन्न झालेल्या जी पी सहस्रबुद्धे एकेरी कॅरम स्पर्धेचा अंतिम सामना चुरशीचा झाला.अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवत रंगतदार खेळ करत राजकुमार ठाकूर यांनी रझाक शेख यांचा २२-७, २२- २० अशा गुणांनी दीड तास सलग सामना खेळून पराभव केला व जी पी सहस्रबुद्धे चषक पटकावला. तसेच रोख रुपये तीन हजारांचे बक्षिस देखील संपादन केले. रझाक शेख यांनी उपविजेतेपद मिळवले. रझाक शेख यांनी द्वितीय पारितोषिक रुपये, दोन हजार व चषक मिळविले.

जिद्दी कॅरमपटू
रंडवणे ज्येष्ठ नागरिक संघाच्या संस्थेतर्फे आयोजित कॅरम स्पर्धेत रझाक शेख हा हरहुन्नरी, जिद्दीचा व नैसर्गिक खेळ खेळणारा कॅरमपटू. या स्पर्धेत विशेष कौतुक म्हणजे रझाक शेख यांची तब्येत बरी नसून ते हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत. सलाईन लावले असतानाही या जिद्दी खेळाडूने डॉक्टरांची परवानगी काढून खेळायला आले. सर्व कॅरमपटू व क्रीडा रसिकांची मने जिंकली. जबरदस्त खेळ दाखवून पहिल्या फेरीपासून शेवटच्या डावापर्यंत चांगल्या लढती दिल्या व उपविजेतेपद पटकावले. रझाक शेख हे नियमित कॅरमचा सराव करतात. अनेकांना कॅरम खेळण्यासाठी प्रोत्साहन देत असतात.
एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात अंतिम सामना बघण्यास खूप मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर लगेचच कॅरम स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न झाला. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष अजित गोखले यांनी केले. स्पर्धा प्रमुख शिरीष जोशी यांनी या स्पर्धेविषयीचा अहवाल सादर केला. प्रमुख पाहुणे दीपक पोटे, संदीप खर्डेकर, जयंत भावे यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना बक्षिसे व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमास कॅरम प्रेमी, शहरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अजित गोखले, सचिव उर्मिला शेजवलकर, कार्याध्यक्ष प्राजक्ता मोघे, पंच अभय अटकेकर, सतीश सहस्रबुद्धे, पंकज कुलकर्णी, माधव तिळगुळकर, विनय फाटक, जयंत मुळ्ये यांनी परिश्रम घेतले.
अंतिम निकाल
१) राजकुमार ठाकूर, २) रझाक शेख, ३) रवी श्रीगादी, ४) सुनील वाघ, ५) माधव तिळगुळकर, ६) दत्तात्रय सलागरे, ७) श्रीकांत बाबर, ८) पंकज कुलकर्णी.