
जेम्स नीशमची घातक गोलंदाजी, २२ धावांत टिपले पाच विकेट
वेलिंग्टन ः न्यूझीलंड संघाने वेलिंग्टन मैदानावर पाकिस्तान संघाविरुद्ध घरच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील शेवटचा सामना ८ विकेट्सने जिंकला आणि मालिका ४-१ ने जिंकण्यात यश मिळवले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाला २० षटकांत ९ गडी गमावून फक्त १२८ धावा करता आल्या. त्यामध्ये न्यूझीलंड संघाचा अष्टपैलू खेळाडू जेम्स नीशम याने ४ षटकांत फक्त २२ धावा देत ५ विकेट्स घेत सामना गाजवला. त्यानंतर न्यूझीलंड संघाने हे सोपे लक्ष्य १० षटकांत पूर्ण केले आणि सामना जिंकला.
जेम्स नीशम पाचवा खेळाडू
पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात जेम्स नीशमने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी केली, तर आता तो पाकिस्तानविरुद्ध चेंडूने अशी कामगिरी करणारा टी २० क्रिकेटमध्ये पाचवा गोलंदाज बनला आहे. पाचव्या टी २० सामन्यात, नीशमने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा, अब्दुल समद, शादाब खान, जहांदाद खान आणि सुफियान मुकीम यांचे बळी घेतले. पाकिस्तानविरुद्ध टी २० मध्ये ५ बळी घेणारा नीशम हा दुसरा न्यूझीलंडचा गोलंदाज आहे. २०१० मध्ये टिम साउथी हा पहिला गोलंदाज ठरला होता.
यापूर्वी, टीम साउथी (५-१८, २०१०), जेम्स फॉकनर (५-२७, २०२६), ड्वेन प्रिटोरियस (५-१७, २०२१), स्पेन्सर जॉन्सन (५-२६, २०२४), जेम्स नीशम (५-२२, २०२५) या गोलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे.
तिसरी सर्वोत्तम कामगिरी
पाकिस्तान संघाविरुद्धच्या पाचव्या टी २० सामन्यात जेम्स नीशमने फक्त २२ धावा देऊन ५ बळी घेतले. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे आणि न्यूझीलंडकडून टी २० मध्ये तिसरे सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन आहे. जेम्स नीशमने आतापर्यंत ८३ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने २४.४५ च्या सरासरीने ४७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच नीशमने फलंदाजीत ६६ डावांमध्ये २१.२२ च्या सरासरीने ९५५ धावा केल्या आहेत.