महाराष्ट्र महिला संघाचा हरियाणावर ८२ धावांनी दणदणीत विजय

  • By admin
  • January 9, 2025
  • 2
  • 179 Views
Spread the love

श्वेता सावंतची अष्टपैलू कामगिरी, ईश्वरी सावकारचे अर्धशतक

छत्रपती संभाजीनगर : बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर २३ महिला टी २० ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने हरियाणा संघाचा ८२ धावांनी पराभव केला. ईश्वरी सावकार (६६) आणि श्वेता सावंत (५०) यांची अर्धशतकी खेळी महत्त्वाची ठरली.

रायपूर येथे झालेल्या या सामन्यात महाराष्ट्र महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात आठ बाद १५७ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. खुशी मुल्ला (५) लवकर बाद झाल्यानंतर ईश्वरी सावकार व श्वेता सावंत यांनी आक्रमक अर्धशतके ठोकत डावाला आकार दिला. ईश्वरी सावकार हिने ५० चेंडूत ६६ धावा फटकावल्या. तिने दहा चौकार मारले. श्वेता सावंत हिने अवघ्या ३६ चेंडूत ५० धावांची आक्रमक खेळी साकारली. श्वेताने अर्धशतक झळकावताना एक षटकार व आठ चौकार मारले. देसाईने २० धावांचे योगदान दिले. हरियाणा संघाकडून ज्योती महला हिने २० धावांत तीन गडी बाद केले.


हरियाणा संघासमोर विजयासाठी १५८ धावांचे आव्हान होते. धावांचा पाठलाग करताना हरियाणा संघ २० षटकात नऊ बाद ७५ धावा काढू शकला. त्यांना ८२ धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला. आचल राय (२०), वंदना सैनी (११), सुशील शर्मा (१७) यांनी धावांचा दुहेरी आकडा गाठण्यात यश मिळवले. अन्य फलंदाज झटपट बाद झाले.

महाराष्ट्र संघाकडून श्वेता सावंत हिने ९ धावांत दोन विकेट घेत आपला ठसा उमटवला. श्वेताला क्रिकेट प्रशिक्षक राहुल पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. यशोदा घोगरे (१-१०), रसिका शिंदे (१-१४), ऐश्वर्या वाघ (१-७), खुशी मुल्ला (१-७) यांनी प्रत्येकी एक गडी बाद करुन विजयात आपला वाटा उचलला. 

2 comments on “महाराष्ट्र महिला संघाचा हरियाणावर ८२ धावांनी दणदणीत विजय

Leave a Reply to Sandeep Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *